नागपूर -परतीच्या पावसाचा प्रवास आजपासून सुरू झाला आहे. ज्या पद्धतीने पावसाचे आगमन आपल्या देशात होते, याचप्रमाणे पाऊस आल्या मार्गाने परतदेखील जातो. हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटले असेल, मात्र शंभर टक्के खरे आहे. परतीच्या पावसाला रिट्रीटिंग मॉन्सून असेदेखील म्हटले जाते. भारतात जेव्हा मॉन्सूनचे आगमन होते, तेव्हा पहिला पाऊस हा केरळमध्ये पडतो, म्हणूनच केरळला मॉन्सूनचे प्रवेशद्वारदेखील म्हटले जाते. परतीच्या पावसाला राजस्थान येथून सुरुवात होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परतीचा पाऊस दक्षिणेकडे वळतो, यालाच परतीचा पाऊस असे म्हणतात.
हेही वाचा -यवतमाळ : नाल्याच्या पुरात 60 ते 70 गाई गेल्या वाहून
प्रवास राजस्थानातून सुरू
साधारणतः १ जूनच्या दरम्यान केरळमध्ये पावसाचे आगमन होते. त्यानंतर मृग नक्षत्रात १० ते १५ जूनच्या काळात हा पाऊस नागपूर, विदर्भासह संपूर्ण राज्यात व्यापला जातो. त्याचप्रमाणे मॉन्सून संपूर्ण देशभरात बरसतो. मॉन्सूनच्या आगमनाची वाट प्रत्येकाला असते. त्यात शेतकऱ्यांना तर पावसाची प्रतीक्षा सर्वाधिक असते. त्यावरच देशाचे अर्थचक्रदेखील अवलंबून आहे. मॉन्सून येताना जसा टप्प्याटप्प्याने येतो तसाच तो टप्प्याटप्प्याने माघारीदेखील जातो. हा प्रवास राजस्थानातून सुरू होऊन दक्षिणेकडे पूर्णत्वास जातो.
हेही वाचा -हातपंपाला हात न लावताही येतंय पाणी.. भूजल पातळी वाढल्याने हातपंपातून पाण्याचे फवारे
परतीच्या पावसाला सुरुवात झाली हे कसे ओळखतात?
दक्षिणेकडून मॉन्सूनचे आगमन होते, त्यानंतर तो मध्य भारताच्या मार्गाने उत्तर-दक्षिण दिशेने भारताच्या सर्व राज्यात व्यापला जातो. त्यानंतर राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरूवात होते. मात्र परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला हे कसे ओळखले जाते, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर नागपूर प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक मनमोहन साहू यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार ज्यावेळी राजस्थानमध्ये सलग पाच दिवस पाऊस होत नाही आणि आभाळ स्वच्छ दिसून येते, तेव्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे गृहीत धरले जाते. त्यानुसार सहा ऑक्टोबर रोजी राजस्थान येथून पाऊस परतीच्या प्रवासाला निघाला असून साधारणपणे १० ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान विदर्भ आणि मध्य भारतातून तो दक्षिणेकडे सरकतो.