नागपूर - नागपुरात शहरात वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरातील तब्बल १९ हजार ऑटो चालकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ३०० पेक्षा अधिक ऑटो चालकांवर गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच बरोबर वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांसह इतर वाहन चालकांचे रेकॉर्ड देखील तपासले जात आहे.
या सर्वांचा वाहन परवाना निलंबित केला जाणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. ऑटो चालकांचे रेकॉड तपासण्यापूर्वी त्यांनी शहरातील ऑटो चालक संघटनांसोबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक ऑटो चालकांला नियमात राहूनच ऑटो चालवावी लागेल. त्यासाठी युनिफॉर्म आणि बॅच लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार अभियानाची माहिती देताना नागपूर शहरात परवानाधारक ऑटो-रिक्षांची संख्या १९ हजार इतकी आहे. तर अनाधिकृतरित्या ऑटो चालवणाऱ्यांची संख्या नेमकी किती आहे. या संदर्भातील आकडे पोलीस विभागासह प्रादेशिक परिवहन विभागाकडे सुद्धा नाहीत. गेल्या काही वर्षाचा रेकॉर्ड तपासला तेव्हा अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये ऑटोचा उपयोग झाला आहे तर अनेक घटनांमध्ये ऑटो चालकांसंदर्भात तक्रारी आल्या आहेत. नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्वात आधी ऑटो चालकांना शिस्त लावण्याची नितांत गरज ओळखून नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नोंदणीकृत १९ हजार ऑटो चालकांचे रेकॉर्ड तपासण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ज्यात तब्बल ३०० पेक्षा अधिक ऑटो चालकांच्या संदर्भात गुन्हे असल्याचे आढळून आले आहे. या शिवाय परवानाधारक ऑटो मालक त्यांच्या नावावर नोंदणी असलेला ऑटो इतर कुणाला भाड्याने देऊन स्वतःचा व्यवसाय करतात. ज्याची नोंद त्या ऑटो मालकाकडे नसते, अशा ऑटो मालकांवर देखील कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा -..तेव्हा चंद्रकांत पाटलांनी हसन मुश्रीफांना दिली होती भाजपात येण्याची ऑफर; व्हिडिओ व्हायरल
तीन पेक्षा अधिक वेळा नियम मोडणाऱ्या ऑटोचे परमिट होणार रद्द -
आयुक्त अमितेशकुमार यांनी ऑटो चालकांच्या संदर्भात फारच कडक भूमिका घेतली आहे. १९ हजार पैकी ३०० ऑटो चालकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आढळून आल्यानंतर त्यांचे परमिट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ज्या ऑटो चालकांनी ३ पेक्षा अधिक वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याची नोंद झाली आहे, अशा ऑटो चालकांचे परमिट सुद्धा रद्द केले जाणार आहे.
हे ही वाचा -दिव्यांगांकरिता घरोघरी लसीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
ऑटो चालकांच्या विरुद्ध तक्रारींचा पाऊस -
नागपूर शहरातील ऑटोचालक मुजोर आहेत. ते कुणालाही जुमानत नाहीत. प्रवाशांसोबत विनाकारण हुज्जत घालतात आणि वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडून प्रवाशांचे जीव धोक्यात आणतात, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नागपूर पोलिसांना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील या कारवाईकडे बघितले जात आहे.