नागपूर- गुन्हे प्रगटीकरणात (डिटेक्शन) राज्यात अव्वल ठरलेल्या नागपुरात पोलिसांचा समाजाभिमुख मानवीय चेहरा समोर आला आहे. शहरातील गंगाजमुना या रेडलाईट परिसरात एक वेडसर महिलेच्या पोटात दुखत असल्याने ती वेदनेने विव्हळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर महिला पोलिसांनी लगेच त्या महिलेची विचारपूस केली. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजताच तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळातच त्या महिलेने बाळाला जन्म दिला आहे.
महिला विवाहित असून मतिमंद -
नागपूर पोलीस एका वेडसर महिलेसाठी देवदूत ठरले आहे. गंगाजमुना परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात असताना सकाळी सातच्या सुमारास पोलिसांना एक वेडसर महिला रस्त्याने फिरत होती. तिच्या पोटात दुखत असल्याने ती रडत होती. बंदोबस्तात तैनात असलेल्या महिला पोलीसांनी तिची विचारपूस केली, तेव्हा ती काहीही उत्तर देत नव्हती. मात्र, तिच्या हालचालीवरून ती मतिमंद असल्याचे महिला पोलिसांना वाटले. ती केवळ
पोटात दुखत असल्याने रडत असल्याचे सांगत होती. महिला पोलिसांनी तत्काळ तिला मेयो रुग्णालयात दाखल केले असता, अवघ्या काही तासात तिने एका बाळाला जन्म दिला. महत्त्वाचे महिला पोलिसांनी समयसूचकता दाखवत त्या महिलेला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले आहेत. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहे. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला, तेव्हा आईचा शोध लागला. आईने पोलिसांना सांगितलं की ती विवाहित असून मतिमंद आहे. रात्री ती घरातून निघून गेली, घरचे तिचा शोध घेत होते. मात्र, ती मिळाली नव्हती. वेळेचे गांभीर्य ओळखून नागपूर पोलिसांनी पुढाकार घेतल्यामुळे ती महिला आणि बाळ सुरक्षित आहे. या करिता नागपूर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.