नागपूर -नागपुरात गेल्या तीन दिवसात उष्माघाताचे (Heat Wave in Nagpur) चार बळी गेल्याचा संशय आहे. गेल्या 10 दिवसांपासून तापमानाचा पारा सलग ४५ अंशांच्या वर आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरु झाला असला तरी विदर्भात पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे मान्सून लांबणीवर (Monsoon in Maharashtra) पडण्याची शक्यता आहे. पण पुढील 24 तासात मान्सून हा दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भातील भागात तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाचे वैज्ञानिक गौतम नगराळे यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर, राज्याची उपराजधानी संत्र्यांसाठी ओळखली जाते. त्यासोबत तीव्र उन्हाळा आणि तापमानासाठी ही नागपूरची ओळख आहे. मे महिन्यात हा पारा ४५ अंशांपर्यंतही जातो. मे महिन्याच्या शेवटी रोहिणी नक्षत्र नवतपा सुरु होतो. त्या 9 दिवसात सर्वाधिक उष्ण लाटा आणि तापमानाची नोंद होते. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, अकोला या शहरात पारा ४५ आणि कधी कधी ४६ अंशांपर्यंत जातो. पण नवतपामध्ये काही दिवस ढगाळ वातावरण राहिले असून या आठवड्यात तापमान वाढलेले आहे.
पुढील आठवड्यात पोषक वातावरण निर्माण झाल्यास मान्सूनचा अंदाज - साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मान्सून दाखल होतो. शेतकरी तर ७ जून म्हणजेच मृग नक्षत्र लागताच पावसाचे आगमन झाल्याचे समजतात. मात्र, यंदा लांबलेल्या उन्हाळ्याने सर्व समीकरण चूकीचे ठरवले आहे. हवामान विभागाचे भाकीतही यंदा वाढलेल्या तापमानापुढे फिस्कटके. 13 जून ते 15 जूनच्या सुमारास तापमानात घट होऊन विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.