नागपूर -राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (st workers strike) सुरू असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील विरोधी पक्षानी पाठिंबा जाहीर केला असून विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) रस्त्यावर उतरले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. पण, यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष एसटी कर्मचाऱ्यांना चिथावून राज्यातील प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे करुन स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचे कारस्थान
भाजप सरकार असतानाही याच मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, सत्तेत असताना त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करणारे आज एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात सामावून घेण्याची मागणी करत आहेत, असा आरोपही यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे तत्कालिन अर्थमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये सामावून घेता येत नाही, असे सांगणारे स्पष्ट व्हिडिओ आहे. आता मात्र सामावून घेण्यासाठी चिथावणी देण्याचे काम भाजप करत आहे. यातून घुमजाव करण्याची भाजप नेत्यांची संस्कृती जनतेसमोर येत आहे. कोरोना अडचणीत असताना ही मागणी करणे म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठीचे हे कारस्थान असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे