नागपूर - गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे, त्यामुळे या विषयावरून राजकारणदेखील सुरू झाले आहे. संजय राऊत यांनीही भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. देश आणि राज्य कोरोनाविरोधात लढाई लढत असताना विरोधी पक्ष मात्र राजकारण करण्यात व्यस्त असल्याचे ते म्हणाले आहेत.
'मुंगेरी लाल के हसीन सपने', मंत्री वडेट्टीवारांचा भाजपला टोला
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विरोधी पक्ष सहकार्य करण्यापेक्षा राजकारण करून सत्ता कशी पुन्हा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, हे त्यांचे प्रयत्न म्हणजे 'मुंगेरी लाल के हसीन सपने' आहे, असा टोला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

सध्या विरोधी पक्षनेते आणि त्यांचे काही नेते हे राज्यपालांना भेटत आहेत. मात्र, ते मुख्यमंत्र्यांना भेटले असते आणि कोरोनाच्या लढाईत सरकारला सहकार्य केले असते तर एक चांगला संदेश लोकांमध्ये गेला असता. मात्र, तसे न करता पालघर प्रकरण, बांद्रा प्रकरण, कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या याचे राजकारण करून महाविकास आघाडीची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे शक्य नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सक्षमपणे कोरोनाशी लढा देत आहेत. आम्ही सर्व एक आहोत, विरोधी पक्षाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.