नागपूर -झारखंड सरकार पाडण्याच्या कटात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते सहभागी असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केला आहे. या षडयंत्राचे केंद्रबिंदू नागपूर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपाचे अनेक नेते तपास यंत्रणेच्या रडारवर येणार आहेत. सध्या पुढे येत असलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काटोल येथील भाजपा नेते चरणसिंग ठाकूर आणि या जयकुमार बेलखोडे यांचे नावं पुढे आले आहेत. जयकुमार बेलखोडे हे या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचे झारखंड पोलिसांकडून सांगितले जात आहे. या संदर्भात बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की झारखंड पोलिसांकडून मला अद्याप चौकशी संदर्भात कोणतीही नोटीस किंवा समन्स मिळालेला नाही. भविष्यात अशी चौकशी होणार असेल तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता
झारखंड पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात असलेल्या सरकारला पडण्याचे षडयंत्र रचले जात होते. या अंतर्गत आमदारांची खरेदी विक्री करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. या संदर्भात अनुप सिंग नावाच्या आमदाराने केलेल्या तक्रारींवरून झारखंड पोलिसांनी रांची येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून तिघांना अटक केली होती. यामध्ये निवारण महतो, अमित सिंग आणि अभिषेक दुबे यांचा समावेश आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भाजपा नेते झारखंड सरकार पडण्याचे षडयंत्र रचत आहेत. झारखंड पोलिसांच्या या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे.