नागपूर - पाकिस्तानने १३ नोव्हेंबरला केलेल्या हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपुत्र भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले होते. त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. हुतात्मा भूषण यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून मदत मिळावी यासाठी अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केला होता.
हुतात्मा भूषण सतई हे २०१० मध्ये नायक या पदावर भरती झाले होते. १३ नोव्हेंबरला श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये तैनात असताना त्यांना वीरमरण आले होते. युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये तसेच देशातील सर्व क्षेत्राअंतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत हुतात्मा झालेल्या जवानांना मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. याच निर्णयअंतर्गत हुतात्मा भूषण सतई यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मंजूर व्हावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर हुतात्मा भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - 'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'