नागपूर - वाहतूककोंडी टाळण्यासाठी शासनाकडून विविध मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. याच उड्डाणपुलाच्या खालून प्रवास करणाऱ्या नागपूरकरांना सौंदर्याची अनुभूती यावी, यासाठी उड्डाणपुलांच्या स्तंभांवर विविध प्रकारचे चित्र साकारले जात आहे. शहरातील सदर मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या स्तंभांवर 'हस्तांकित' संस्थेच्यावतीने हे मनमोहन चित्र रंगविले जात आहे. विशेष म्हणजे हे चित्र रंगविणारे चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना ही कलाकृती आकर्षित करत आहे.
चित्रकला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा समावेश
नागपूर शहर काळाबरोबर झपाट्याने बदलत आहे. नागपूरकरांना शहरातील रस्त्यावरून प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून शासनाकडून विविध मार्गांवर उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. याच उड्डाणपुलांची शोभा वाढविण्यासाठी पुलांच्या स्तंभांवर साकारली जात आहेत विविध आकर्षित चित्रे. शहरातील हस्तांकित कला संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. यात नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिवाय या चित्रांमध्ये मॉर्डन आर्ट, क्रीडा क्षेत्राशी संबंधित आर्ट यासह इतरही चित्रप्रकार पाहायला मिळतात. इतकेच नाही तर या चित्रांचे स्वरूप त्या त्या भागातील नागरिकांच्या वास्तव्यावरून साकारण्यात येत असल्याचे कलाकार सांगतात. तर दुसरीकडे शहरातील मानकापूर भागात क्रीडाविश्वाशी संबधित चित्रे पाहायला मिळतात. त्यामुळे आपसूकच या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना ही चित्रे खुणावतात. शिवाय एक चित्रकार म्हणून नागपूरच्या सौंदर्यीकरणात भर घालतांना आनंद वाटतो, अशी भावनाही चित्रकारांनी बोलून दाखविली.