नागपूर - रविवारी रात्री उशिरा नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या कामगार नगर चौकात पायी फिरत असलेल्या एका व्यक्तीवर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. शेख शकील नामक व्यक्तीवर गोळीबार झाला होता. यात एक गोळी त्याच्या मानेला घासून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून शेख शकील यांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
Nagpur Crime : गोळीबार झालेल्या शेख शकीलची तब्येत धोक्याबाहेर, एक संशयित आरोपी ताब्यात - शेख शकीलवर नागपुरात गोळीबार
नागपुरात पायी फिरत असलेल्या एका व्यक्तीवर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. शेख शकील नामक व्यक्तीवर गोळीबार झाला होता. यात एक गोळी त्याच्या मानेला घासून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला देखील ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे देखील पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. शेख शकील हे जेवण झाल्यानंतर पायी फिरत असताना दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोराने एक गोळी झाडली. या घटनेत शेख शकील जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जखमीवरसुद्धा अनेक गुन्ह्याची नोंद - शेख शकील यांच्या विरोधातही काही गुन्ह्यांची नोंद असून ते गौ तस्करीशी जोडलेले आहेत, त्यामुळे गुन्हेगारांमधील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. शकील विरोधात आर्म्स ऍक्ट संदर्भात गुन्हे दाखल आहेत.