नागपूर -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध होऊ शकले नव्हते. हर घर तिरंगा मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल असा त्यामागचा उद्देश होता. मात्र,अवघ्या काही दिवसात नागपुरात चार हजार राष्ट्र ध्वज तलावाच्या काठावर टाकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोराडीपासून काही अंतरावरील कोराडी तलावाला लागून असलेल्या नांदा परिसरात उघडकीस आली आहे. चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रीय ध्वज टाकून दिल्याचे पुढे आले आहे.
मौदा पंचायत समितीचे नाव - ज्या चार बोऱ्यांमध्ये राष्ट्र ध्वज फेकून देण्यात आले आहेत, त्यापैकी एका बोऱ्यावर मौदा पंचायत समिती असे लिहिलेले आहे. हर घर तिरंगा मोहीम पार पडल्यानंतर कोणीतरी बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी किंवा पुरवठादाराने अशा पद्धतीने राष्ट्रीय ध्वज तलावाच्या काठावर टाकले आहेत का अशी शंका निर्माण झाली आहे.