नागपूर - नागपूरच्या हल्दीराम रेस्टॉरंटमधील ग्राहकाच्या सांबर वड्यात पालीचे मेलेले पिल्लू आढळून आले होते. या घटनेचा अन्न व औषधी प्रशासन विभागाने स्वतःहून तपास सुरू केला आहे. ज्या ग्राहकाचे डिशमध्ये पालीचे पिल्लू आढळले होते त्यांनी कोणतीही लेखी तक्रार दिली नसल्याने या प्रकरणात एफडीआय विभागाला कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.
हल्दीराम प्रकरण : एफडीआयकडून तपास सुरू; हॉटेलचे किचन बंद ठेवण्याचे निर्देश
एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी थेट हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये जाऊन तेथील किचनच्या तपासणी केली आहे.
या प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने तत्काळ हल्दीरामच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांच्या किचनच्या पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी काही त्रुटया आढळून आल्या आहेत. त्या अनुषंगाने एफडीआयने त्रुट्या दुरुस्ती केल्याशिवाय किचन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. हे प्रकरण मंगळवारी सकाळी अग्निहोत्री कुटुंबातील बहीण भाऊ जेव्हा हल्दीरामच्या रेस्टॉरंटमधून नाश्ता करण्यासाठी गले असताना त्यांच्या डिशमधील सांबर वड्यात पालीचे मेलेले पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर त्या दोघांनी या प्रकरणाची कोणतीही तक्रार एफडीआय किंवा पोलिसांकडे न करता थेट रुग्णालय गाठले. तोपर्यंत ती डिश हल्दीराम प्रशासनाने नष्ट केली होती.
ज्यावेळी एफडीआय प्रशासनाला या संदर्भात माहिती समजली तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मुळात या प्रकरणातील तक्रारदार असलेले अग्निहोत्री यांनी एफडीआयकडे कोणतीही तक्रार केली नसल्याने एफडीआयला या प्रकरणाचा तपास करण्यात काही अडचणी येत आहेत. तरीदेखील एफडीआय प्रशासनाने स्वतःहून हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी थेट हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये जाऊन तेथील किचनच्या तपासणी केली आहे. त्यावेळी किचनमध्ये अनेक त्रुट्या आढळून आल्याने त्या दुरुस्त होईपर्यंत किचन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कालपासून एफडीआयचे अधिकारी त्या दोघांशी बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार देत असल्याने एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी देखील हात टेकले आहेत.