नागपूर- गेल्या काही दिवसापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पीएचडी पूर्व परीक्षा म्हणजेच 'पेट'ची नोंदणी सुरू झाली आहे, असे संदेश समाज माध्यमातून फिरत आहेत. त्यामुळे 'पेट'करिता नोंदणी करण्यासाठी विद्यार्थांची चांगली झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र 'पेट' बाबत कोणतीही नोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून देण्यात आले आहे. पेट बाबात सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश हे खोटे असल्याचेही मूल्यमापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय अशा खोट्या संदेशांवर विश्वास ठेऊन संभ्रमित होऊ नका, असे आवाहनही विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
पीएचडी पूर्व परीक्षेबाबत समाज माध्यमात अफवेचा बाजार; विद्यार्थ्यामध्ये संभ्रम - सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडीसाठी होणारी प्रवेश परीक्षा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण या पेट बाबत सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती व्हायरल होत आहे. मात्र विद्यापीठाकडून अद्याप पूर्व परीक्षा बाबतचे वेळापत्रक जारी केले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
असा आहे व्हायरल संदेश-
पीएचडी प्रवेशाकरीता 'पेट' देणे अनिवार्य आहे. अशावेळी यंदा कोरोनामुळे ही 'पेट' घेण्याकरीता विद्यापीठ प्रशासनाला उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पीएचडी पूर्व परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आधीच संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीच पीएचीडीची 'पेट' ही १३ ते १४ डिसेंबर या कालावधी होणार आहे, असा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. या संदेशामुळे पीएचडी करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणीसाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. मात्र नोंदणी व परीक्षेसंदर्भातील 'तो' संदेश खोटा असल्याचे स्पष्टीकरण परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून देण्यात आले आहे.
विद्यापीठाची स्पष्टोक्ती व पेट बाबचे नियोजन-
विद्यापीठाकडून अजूनही कोणतीची अधिकृत माहिती किंवा परीक्षेबाबतची सूचना संकेत स्थळावर टाकण्यात आली नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत तारीख विद्यापीठ जाहीर करत नाही. तोपर्यंत 'पेट' होणार नाही. असेही संबंधित विभागाने सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियातून फिरत असलेल्या कोणत्याही खोट्या संदेशाला बळी पडू नका. शिवाय या संदेशांमुळे संभ्रमित होऊ नका, असे आवाहनही परीक्षा विभागाने केले आहे. तसेच कोरोनामुळे 'पेट' घेण्यास उशीर होत आहे. त्यामुळे लवकरच परीक्षेबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मागील वर्षी या महिन्यात झाली होती पेट -
गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरीस पीएचडी प्रवेशासाठी होणारी पूर्व परीक्षा पार पडली होती. त्यामुळे विद्यार्थांना पीएचडी प्रवेशाकरीता वाट पाहावी लागली नाही. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात ही परीक्षा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशाकरीता वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमधे नोंदणीच्या तारखेवरून आणि खोट्या अफवेवरून चांगलेच संभ्रम निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
असा आला प्रकार उघडकीस-
पेट नोंदणींचा संदेश पाहून विद्यार्थ्यांनी संकेत स्थळावर भेटी देण्यासाठी सुरुवात केली. मात्र संकेत स्थळावर कोणत्याही सूचना किंवा पेट बाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा विभागाला फोन करत विचार केली. त्यावेळी परीक्षा विभागाकडूनही नोंदणी सुरू न झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा ही बाब खोटी असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. एकंदरीतच सोशल माध्यमातून फिरत असणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास न ठेवता, वेळो वेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट देऊन अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावे, अशी स्पष्टोक्तीही विद्यापीठ व परीक्षा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.