नागपूर - छत्रपती शिवरायांच्या जयंतीवर निर्बंध लादणे हे दुर्दैवी आहे. कोरोनाच्या काळात काळजी घेतली पाहिजे हे मान्य आहे. पण ती काळजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतानाच का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी पक्षांचे कार्यक्रम होतात, मोर्चे निघतात, रॅल्या निघतात त्यावेळी कलम 144 का लागू केले जात नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतानाच निर्बंध का घालण्यात आले? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ते नागपूरमध्ये शिवाजी नगर उद्यानातील शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.
निर्बंध लादणे दुर्दैवी
छत्रपती शिवरायांच्या जयंतीवर निर्बंध लादणे हे दुर्दैवी आहे. आम्हाला जयंती साजरी करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. या राज्यात मोघलाई सहन केली जाणार नाही, हा स्वतंत्र भारतातील छत्रपती शिवायरायांचा महाराष्ट्र आहे. जर कोणी छत्रपतींच्या जयंतीवर निर्बंध घालत असेल तर आम्ही त्याचा मुकाबला करू, जर कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करून, जयंती साजरी होणार असेल तर मग निर्बंध का घातले जातात? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.