नागपूर - ७ डिसेंबरपासून सुरू होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेऊ नका, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका प्रचंड वाढलेला आहे. अशात हिवाळी अधिवेशन नागपुरात झाल्यास त्याचा विपरीत परिणाम नागपूरच्या आरोग्यावर होईल, त्यामुळे नागपूरचे अधिवेशन रद्द करावे आणि अधिवेशनावर होणारा खर्च आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपयोगी आणावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यासोबत साधलेला संवाद हेही वाचा -आटगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा डब्बा घसरला, वाहतूक ठप्प
केवळ नागपूरच नव्हे तर यामुळे विदर्भातील जनतेचे आरोग्य संकटात येणार असल्याने विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांनी या मागणीसाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे.
प्रत्येक डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात येते. मात्र, सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याची तयारी सुरू करावी लागते. सध्या आमदार निवास येथे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे, जर अधिवेशन झाले तर ते देखील रिकामे करावे लागेल. शिवाय रवीभवन आणि इतर इमारती देखील रिकाम्या कराव्या लागतील. त्यामुळे आधीच तणावात असलेल्या प्रशासनावर आणखी ताण येणार आहे. त्यामुळे यावर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घ्यावे, या मागणीसाठी विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे.