नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण कमी झालेल्या आणि कोरोनाग्रस्त रुग्ण अधिक आढळून आलेल्या नागपूर जिल्ह्यातील गावांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीकरणाराचा टक्का वाढवण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा आता गावागावात उतरली आहे. यात काही निवडक गावांमध्ये खुद्द जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले आहेत.
नागपुरातील लसीकरण घटलेल्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट - जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
लसीकरण कमी झालेल्या आणि कोरोनाग्रस्त रुग्ण अधिक आढळून आलेल्या नागपूर जिल्ह्यातील गावांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीकरणाराचा टक्का वाढवण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा आता गावागावात उतरली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यलयाय घेतलेल्या बैठकीतील सूचनेनूसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा, अरोली, कोदामेढी, रामटेक तालुक्यातील मनसर, पारशिवनी तालुक्यातील करंभाड, सावनेर तालुक्यातील बळेगाव या ग्रामपंचायतींमध्ये आढावा बैठक घेतली. लसीकरणाने कोरोनाची गंभीरता कमी होते. यामुळे लसीकरणावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या.
निर्बंधांमुळे रुग्णसंख्येत घट
प्रशासनाने राबविलेल्या निर्बंधामुळे कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी होत आहे. आज जिल्हयात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज 6544 रूग्ण बरे झाले असून निम्यापेक्षा कमी म्हणजेच 3104 नव्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन आता प्रशासनाकडून केले जात आहे.