नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. एकीकडे हा कायदा रद्द होण्यामागे राज्य सरकारचे अपयश असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. तर दुसरीकडे या करिता केंद्र सरकार आणि मागील भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यात आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आरक्षणाचे श्रेय भाजपला मिळू नये, म्हणून या आरक्षणाचा मुडदा पडण्याचे काम सरकारने केल्याच्या आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
'राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला'
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य सरकार आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र आणि मागील राज्य सरकारवर जबाबदारी ढकलून मोकळे होण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा होती असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आतापर्यंत या विषयावर राजकीय न बोलण्याचे ठरवले होते. मात्र मी आता स्पष्टपणे बोलणार असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आरोप राज्य सरकारवर केला आहे. आमच्या सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकले नाही, किंबहुना ना ते टिकू नये यासाठीच राज्य सरकार प्रयत्न करीत होते, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळू नये याकरिता राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.