नागपूर - 'केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे'. असा दावा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने शेतकऱ्यांप्रती दाखवलेले प्रेम किती बेगडी आहे, याचे देखील त्यांनी काही पुरावे सादर केले. केंद्र सरकारने आज आणलेला कायदा हा तत्कालिन राज्य सरकारने २००६ सालीच राज्यात आणला होता, त्यामुळे राज्यात कायदा करताना तो योग्य असतो आणि राष्ट्रीय स्तरावर मात्र त्याला प्रखर विरोध करायचा, हेच काँग्रेसचे बेगडी प्रेम असल्याचे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला योग्य भाव देणे, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचा जीवनस्तर उंचावणे हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सुद्धा याच मुद्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आज जेव्हा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे, तेव्हा काँग्रेसकडूनच या विधेयकांना तीव्र विरोध केला जात आहे. त्याचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम बेगडी आहे, त्याचबरोबर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी सुद्धा या विधेयकांच्या विरोधात मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताला जास्त प्राधान्य असल्यानेच केंद्राने देखील त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात वेळ गमावला नाही, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा -चंद्रकांत पाटलांनी कंगना रणौतला दिला 'हा' सल्ला...
'शिवसेना पूर्णपणे संभ्रमित पक्ष आहे. ज्या विषयाला ते लोकसभेत समर्थन देतात, त्याच विषयाला राज्यसभेत विरोध करतात. नीती आयोगाने शेतकऱ्यांच्या विविध विषयांना घेऊन एक टास्क फोर्स स्थापन केले होते, तत्कालीन मुख्यमंत्री कामालनाथ आणि कुमार स्वामी हे देखील त्या टास्क फोर्समध्ये होते. त्यांनी देखील यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत, त्या सूचनांना या विधेयकांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -अजित पवारांनीच केला शरद पवारांचा गेम - निलेश राणे