नागपूर - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला राज्याचे वन मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी आज वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन आजपर्यंत झालेल्या तपासाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने संतापलेल्या चित्रा वाघ आणि पोलीस अधिकारी दीपक लगड यांच्यात वादावादी झाली आहे. या संदर्भात आज माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन पोलीस अधिकारी दीपक लगड यांची तक्रार केली आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील सेवनहिल पार्क या सोसायटीतील एका इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची नोंद वानवडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलेला आहे. दरम्यान या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यानंतर वनमंत्री राठोड सुमारे पंधरा दिवस गायब राहिले. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी येऊन शक्तिप्रदर्शन केल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी-
आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या वानवडी पोलीस ठाण्यात देखील गेल्या. त्यावेळी पोलीस अधिकार दीपक लगड यांनी चित्रा वाघ यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यावर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले.
अनेक प्रश्न अनुत्तरित-
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील अनेक प्रश्न गेल्या अठरा वीस दिवसांपासून अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात नसल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. पोलिसांनी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे गेल्या तीन वर्षातील लोकेशन तपासणे गरजेचे आहे. सोबतच लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये असलेल्या फोटो संदर्भात पोलिसांनी तपास केलेला नाही. यवतमाळ येथे रात्री उशिरा गर्भपात होणे. यासह अनेक प्रश्नांचे उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
पूजा चव्हाण तपासावर काहीही बोलणार नाही- डिजी
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घडलेल्या प्रकरणासंदर्भात माझ्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जाईल. मात्र पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात चौकशी सुरू असताना मी यावर काहीही भाष्य करणार नसल्याचं पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास अपघाती मृत्यू प्रमाणेच केला जातोय. त्यामुळे जर तर वर मी बोलणार नाही. पुणे पोलिसांना निष्कर्षावर पोहचू द्या, मग त्यावर बोलता येईल, असं देखील ते म्हणाले आहेत.
हेही वाचा-'संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा'