नागपूर - महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. गुन्ह्याला वाचा फोडा गुन्हेगाराला हमखास शिक्षा मिळेल असेदेखील ते म्हणाले आहेत. नागपूरमध्ये वन्यजीवांच्या पहिल्या प्रयोगशाळेची सुरुवात करण्यात आली आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
हेही वाचा -प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कायदेशीर प्रक्रियेला मिळणार गती
पुढे ते म्हणाले, की महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे, गुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नव्या प्रयोगशाळेची उभारणी
नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले.
'नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच मिळणार लाभ'
आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज फास्टस्ट्रॅक मुंबई, नागपूर, पुणे येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस, मुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून महाआघाडी अन् भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप !
'महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान'
सध्या जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे. मुंबई पोलिसांनी 27 कोटी रुपयांचे हेरॉइन पकडले. पण त्यात कोणत्याही हिरोइनचा संबंध नसल्याने पोलिसांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही. महाराष्ट्र पोलिसांची ख्याती देशभर आहे. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकासुद्धा या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.