महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऊर्जा खात्यानेच काढली बावनकुळेंची 'ऊर्जा'! - nagpur politics

नागपुरातील कामठी मतदारसंघातून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहेत. बावनकुळेंना तिकीट नाकारण्याची कारणे कोणती, याविषयी ईटीव्ही भारतने केलेले हे विश्लेषण...

चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Oct 5, 2019, 4:01 PM IST

Updated : Oct 5, 2019, 5:01 PM IST

नागपूर- भाजपने विधानसभा निवडणुकीत 2 मंत्र्यांसह तब्बल 22 विद्यमान आमदारांच्या हाती नारळ दिले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून यांच्या उमेदवारीची दोर कापल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. विनोद तावडे व चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याने एकच खळबळ उडाली. विनोद तावडे यांची मुख्यमंत्री पदाची त्यानंतर गृहमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा लपून राहिली नव्हती. त्यामुळे बोरिवलीतून त्यांची उमेदवारी का कापली याविषयीचे वेगवेगळे तर्क-वितर्क लावता येईल. मात्र, गडकरी-फडणवीसांच्या अगदी निकट असलेल्या बावनकुळेंचा पत्ता कट झाल्याने भाजपने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे.

रिक्षाचालक ते जि.प. सदस्य, आमदार तसेच कॅबिनेटमंत्री व पालकमंत्री पद असा बावनकुळेंचा चढता राजकिय आलेख आहे. 2014 पासून गडकरी-फडणवीस यांच्यानंतर नागपुरात बावनकुळेंचा दबदबा आहे. गडकरी समर्थक अशी त्यांची ओळख असली तरी फडणवीसांसोबत देखील भाऊबंदकीचे त्यांचे संबंध आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रत्येक निर्णयांचे व कामांचे अभिनंदन फडणवीसांनी केले आहे. किंबहूना फडणवीसांनी नागपुरातील विविध कामांच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविल्या. त्यामुळे बावनकुळे यांच्या सभोवताल मोठे राजकिय वलय निर्माण झाले. अशात अचानक पक्षाने कामठीतून त्यांना उमेदवारी नाकारणे, हा मोठा राजकिय भुकंप मानला जात आहे. त्यामुळे बावनकुळेंना उमेदवारी का नाकारली, याबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र राज्याच्या उर्जा मंत्रालयाची धुरा देण्यात आली. बावनकुळे हे विरोधी पक्षात असताना विविध वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेत सक्रिय होते. तसेच ते वीज प्रकल्प असलेल्या कोराडी येथील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना ऊर्जा विभागातील बारकावे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. उर्जामंत्री पदी विराजमान होताच त्यांनी कोराडी, खापरखेडा तसेच विदर्भातील वीज प्रकल्पांमधील प्रशासकीय कामांमध्ये अनेक फेरबदल केले. त्याचप्रमाणे विकासकामांचा देखील धुमधडाका लावला. त्यांच्या प्रयत्नाने कोराडी येथील थर्मल पॉवर प्रोजेक्ट येथे 1 हजार 980 मेगा व्हॅटचा संच उभारण्यात आला. या प्रोजक्टचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एप्रिल 2017 ला झाले. यावेळी पियुष गोयल हे केंद्रीय ऊर्जामंत्री होते. नागपूरच्या राजकिय वर्तुळात सध्या अशी चर्चा आहे की, या कामांच्या कंत्राट वाटपावरून पियुष गोयल आणि बावनकुळे यांच्यात खटके उडाले. दोघांनीही कंत्राट वाटपात आप-आपल्या हितचिंतकांना प्राधान्य दिले. मात्र, पियुष गोयल हे केंद्रातील वजनदार नेते आणि नरेंद्र मोदी व अमित शाहंच्या मर्जीतील आहेत. गोयल यांनी बावनकुळेंची वर्तवणूक शाह यांच्या लक्षात आणून दिली आणि बावनकुळे दिल्लीच्या रडारावर आले. बावनकुळेंचे तिकीट कापण्यामागचे हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. तसेच ऊर्जा खात्यातील बदल्या, नियुक्त्या आणि अधिकाऱ्यांसोबत वर्तवणुकीच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्याने ते हिटलिस्टवर आले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील भारनियमाला अदानी आणि इंडिया बुल्स या वीज कंपन्यांना जबाबदार धरले होते. तसेच या कंपन्यांकडून करारप्रमाणे कोळसा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे अदानी यांनी वीज दर वाढवल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यामुळे उद्योजकांची नाराजी बावनकुळेंनी ओढवून घेतली. या उद्योजकांनी अमित शाहंना सदरची माहिती दिली. त्यामुळे या सर्व निर्णयांचे फळ बावनकुळे यांना मिळाले असल्याचीही चर्चा खासगीत होत आहे. त्याचप्रमाणे बावनकुळे यांनी शहरातील विवध प्रकरणे निकाली काढली. अर्थातच याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतल्याने त्यांनी केलेली कामे पराभूत झाली. शिवाय या पक्षश्रेष्ठींच्या नजरेत ते कट्टर गडकरी समर्थक आहेत, अशी समज होती. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयातील या ऊर्जावान कारणांमुळेच बावनकुळेंना बेरोजगार व्हावे लागले असल्याची प्रतिक्रिया राजकिय वर्तुळात आहे.

Last Updated : Oct 5, 2019, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details