नागपूर - राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. समाजाच्या रक्षणकर्ता महिला पोलीस कर्मचाऱ्याची तक्रारदेखील घेतली जात नसून दोषींना पाठीशी घालण्याचे पाप राज्य सरकारप्रमाणेच पोलीस विभागाकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात एका गतिमंद मुलीवर एकाच रात्रीतून दोन वेळा बलात्कार झाल्यानंतर या घटनेची तक्रार दाखल करायला दोन दिवस का लागले, असा प्रश्न नागपूर पोलिसांना विचारला आहे.
'महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली'
चित्रा वाघ आज नागपूरच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी एकाच रात्री दोन वेळा सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या पीडित तरुणीची भेट घेतली आहे. याशिवाय पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या समोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित झालेल्या महेश राऊतच्या कुटुंबीयांचीदेखील भेट घेतली. त्यानंतर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन दोन्ही प्रकरणातील चौकशीच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली आहे. त्यांनी महेश राऊत आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा प्रश्न हा केवळ नागपूरपुरता मर्यादित राहिला नसून या घटनांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असल्याचे म्हटले आहे.