नागपूर -कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाल्याने वारकरी संप्रदाय दुखावला गेलेला आहे. शेकडो वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात वारीची ऐतिहासिक परंपरा आहे. मात्र सरकारच्या जाचक निर्बंधांमुळे ही परंपरा खंडित झालेली आहे. एकीकडे हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्नसमारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रासपणे सुरू आहेत. यामध्ये होत असलेल्या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नाही तर दुसरीकडे मोजक्या लोकांच्या उपस्थित वारी करू द्यायला सरकार परवानगी देत नसल्याच्या निषेधार्थ आज नागपूरच्या संविधान चौकात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात वारकऱ्यांनी भजन आंदोलन केले. यावेळी वारकऱ्यांनी भजने गाऊन सरकारचा निषेध नोंदवत रिंगण घातले होते.
नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात वारकऱ्यांचे भजन आंदोलन 'वारी मुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे का?'
आपल्या महाराष्ट्राची भूमी साधू संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. वारी आणि वारकरी संप्रदाय या परंपरेचा अविभाज्य घटक आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा खंडित झाली आहे. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यामुळे सर्वत्र जनजीवन सामान्य झालेले आहे. सरकारने हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा यासह सर्वच कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे. मग केवळ वारी मुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे का असा संतप्त प्रश्न वारकऱ्यांनी केला.
वारकऱ्यांच्या मागण्या -
- राज्यातील सर्व मंदिरे, देवस्थाने, मठ येथे नियमांची मर्यादा ठेवून त्वरित उघडण्यास परवानगी देण्यात यावी.
- 750 वर्षांची पायी वारीची परंपरा तसेच यावर्षी तुकाराम महाराजांच्या 360 व्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात यावी
- निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या मानाच्या दहा पालख्यांसोबत किमान 350 ते 400 पालख्या पंढरपुरात दाखल होतात, म्हणून प्रत्येक पालखीसोबत किमान तीन ते चार लोकांना वारी करू द्यावी तर मानाच्या प्रत्येक पालखीसोबत पन्नास लोकांना वाढीची परवानगी देण्यात यावी.
- ज्या वारकऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत, अशाच लोकांना पायीवारी करण्याची परवानगी देण्यात यावी.
- ज्या ठिकाणी संक्रमणाचा धोका असेल त्या ठिकाणी वारकरी गावाबाहेर माळरानात मुक्काम करतील.
- ज्येष्ठ सप्तमी ते एकादशी अशी 20 दिवसांची वारी केवळ दहा दिवसात पूर्ण करतील.
- एकादशीनंतर 15 दिवस दहा ते वीस वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन करू द्यावे.
हेही वाचा- PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण