नागपूर- टीव्हीवरील क्राईम पेट्रोलचे शो बघून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱयाचाच काटा काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात घडली आहे. राजश्री डेकाटे असं त्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास केल्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
दोन डिसेंबरच्या रात्री नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत डेकाटे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ल्या झाला होता. या घटनेत राजश्री डेकाटे या किरकोळ जखमी झाल्या होत्या, तर त्यांचे पती राकेश मात्र गंभीर जखमी झाले होते. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर राजश्री यांची वागणूक संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास केला असता संपूर्ण प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी राजश्री आणि तिचा प्रियकर रजत सोमकुवर याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन डिसेंबरच्या रात्री राकेश आणि राजश्री डेकाटे हे दोघे राजश्री यांच्या माहेरातून नागपूरला परतत असताना गोरेवाडा परिसरात राजश्री यांनी ओकारी आल्याचे कारण सांगून राकेश यांना दुचाकी थांबवायला लावली. त्याच वेळी चेहरा झाकलेल्या हल्लेखोराने राजश्री आणि राकेश यांच्यावर हल्ला केला. राजश्रीला किरकोळ मारहाण केल्यानंतर हल्लेखोराने हातातल्या हत्याराने राकेश यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी हा राकेश यांना गंभीर जखमी अवस्थेत सोडून पळून गेला. राजश्री यांनी घटनेच्या अनेक तासानंतर गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये पतीवरील हल्ल्याची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही जोरात तपास सुरु केला. मात्र, हल्लेखोराने डेकाटे दांपत्त्यांकडून कोणतीही लूट केली नव्हती. त्यामुळे हल्ल्याचा उद्दिष्ट नेमका काय हे पोलिसांना स्पष्ट होत नव्हते.