नागपूर : कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक वीज ( Koradi and Khaparkheda Thermal Power Plants ) प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे राख बंधारा आणि वीज केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरतील अनेक गावे प्रदूषणाचे गंभीर परिणाम सोसत होते. तेच पावसाळ्यात खसाळा राख बंधारा फुटून ( Khasala Rakh Dam Burst ) आणि खापरखेडा पाईपलाईन फुटून राख नदीत पोहचली. हेच पाणी शरीरात जाऊन धोकादायक ठरत आहे. नागपुरातील पर्यावरण आणि लोकांच्या आयुष्यावर झालेल्या दुष्परिणामाचा अभ्यास सेंटर फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंट ( Center for Sustainable Development ) या संस्थेच्या संचालिका लीना बुद्धे ( Director Leena Budhe ) यांनी केला. हे राखमिश्रित पाणी किती जीवघेणे ठरत आहे जाणून घेऊया ई-टीव्ही भारतच्या खास रिपोर्टमधून.
कोराडी बंधारा फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीला फटका : यंदाच्या पावसामुळे कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा 16 जुलै रोजी फुटला. हा बंधारा 341 हेक्टरवर विस्ताराला आहे. अचानक पाऊस वाढल्याने बंधारा फुटला, त्यामुळे खसाळा, खैरी, सुरादेवी, म्हसाळा कवठा या पाच गावांत भयानक चित्र यावेळी पाहायला मिळाले. आजूबाजूच्या गावातील शेतीत राखेचा चिखल झाला. हे कमी होते की काय, 24 जुलै रोजी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून राखेचे वहन करणारी पाइपलाइनला गळती लागल्याचे समोर आले. दोन्ही घटनांमुळे प्रदूषित राख नदीच्या लाखो लिटर पाण्यात मिश्रित झाली.
आरोग्यावरही दुष्परिणाम : राखेचा बंधारा फुटून राखेच्या चिखलामुळे शेतजमीन उद्ध्वस्त झाली. शिवाय जमिनीतील जलसाठा नदी-नाल्यांचे प्रदूषण होऊन पर्यावरणीय नुकसान झाले. यातच मागील अडीच वर्षांपासून औष्णिक वीज केंद्राच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या "सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेतील अभ्यासकांच्या मते राख गळतीचे दृश्य परिणामापेक्षा आरोग्यावरील अदृश्य परिणाम जास्त गंभीर असल्याचा दावा केला आहे. या अभ्यासात शरीरासाठी घातक हेवी मेंटल्स, अल्युमिनियम, अँटीमनी, कॅडमियम, बोरॉन, आरसेनिक, लिथिनियम, सिलिनियम, वेनेडियम आणि मर्क्युरीसारख्या धातूंचा समावेश आहे.
प्रदूषित पाण्याचा मानवासह मुक्या जीवनावरही फटका : नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामुळे राखेचे प्रदूषण अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून, अविरत सुरू आहे. यामध्ये असर, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी) आणि मंथन अध्ययन केंद्र अशा या तिन्ही संस्थांनी आजूबाजूच्या 21 गावांतील पाण्याचे नमुने घेऊन केलेल्या तपासणी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सच्या अहवालात मानांकापेक्षा कितीतरी पटीने अधिक जास्त प्रमाणात हेवीमेटल्स मिळून आले.
आजूबाजूच्या गावांतील स्थानिकांना मोठमोठ्या रोगांनी ग्रासले : यातून कर्करोग, श्वसनरोग, किडनीस्टोनसारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. या प्रदूषणामुळे मानवच नाही, तर परिसरतील गुरे-ढोरे, पाळीव प्राणी, पशु-पक्ष्यांनासुद्धा यातना सहन कराव्या लागत आहे. अनेकांना अल्झायमरसारखे आजारही होत आहे. त्याचबरोबर हाडे ठिसूळ होत असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आरोग्यावरील विपरित परिणामास समोर येण्यास काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. यात सुरादेवी, वारेगाव गावामध्ये जवळपास 80 टक्के लोक किडनी स्टोनचे रुग्ण असल्याचे सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपचारे यांनी ई-टीव्हीशी बोलताना सांगितले.