नागपूर- संगणक शिकवणी वर्गात एका 18 वर्षीय विद्यार्थीनीच्या डोक्यावर मनोरुग्णाने हथोडा मारून तिला जखमी केल्याची घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत ती विद्यार्थी किरकोळ जखमी झाली आहे. या प्रकरणी अजनी पोलिसांनी 35 वर्षीय मनोरुग्ण आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे. सध्या जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये उपचार सुरू झाले आहेत.
18 वर्षीय विद्यार्थिनी मेडिकल चौकातील एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी वर्गात दाखल होताच मनोरुग्णाने मागून तिच्या डोक्यावर घाव घातला. सुदैवाने ती इन्स्टिट्यूटच्या पायऱ्या चढत असल्याने घाव जोरात लागला नाही. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इन्स्टिट्यूटसह शेजारचे लोक तिच्या मदतीसाठी धावले. त्यामुळेच आरोपी दुसरा वार करू शकला नाही. नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.