नागपूर -हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांनी आर्थिक फसवणूक करणारा विजय गुरनुले याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याने गोळा केलेले पैसे जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. नागपूर पोलिसांनी पहिल्या टप्यात 55 लाख 47 हजारांची रोकड जप्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपीने ही रोकड अमरावती येथील एका नातेवाईकाच्या घरात पुरून ठेवली होती. याबाबत पोलीस उपायुक्त नूरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. आतापर्यंत आरोपीकडून 1 कोटी 3 लाख 82 हजार 432 रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
टाळेबंदीच्या काळात सर्व उद्योग-धंदे रसातळाला जात होते. त्यावेळी नागपुरातील एक कंपनी जीची स्थापना देखील टाळेबंदीच्या काळतच झाली होती. त्या कंपनीत हजारो गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्यात कष्ठाने कमावलेली मिळकत दुप्पट परतावा मिळेल या अपेक्षेने गुंतवले होते. ती कंपनी अचानक बंद झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर पोलिसांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत तपास सुरू करण्यात आला. तेव्हा या संपूर्ण फसवणूकीचा मास्टर माईंड विजय गुरनूले असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला बुलडाणा येथून अटक करण्यात आली.
नागपूरसह इतर राज्यातही गुंतवणूकदार
या आरोपीने नागपूरसह इतर राज्यात लोकांना जास्त व्याजाचा आमिष दाखवून वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला होता. मेट्रो व्हिसल बिल्डकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची "रियल ट्रेंड" नावाची योजना यशाचे नवे शिखर गाठत होती. टाळेबंदीच्या काळात पैसे कमावण्याची संधी समजून अनेकांनी डोळे झाकून कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.