नागपूर - नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना परिस्थिती बिकट असताना नागपूरमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नागपुरात कोरोनाचे 5 नवीन स्ट्रेन सापडले आहेत. दिल्लीहून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 35 नमुन्यांमध्ये हे नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशी या नव्या स्ट्रेनची प्रमुख लक्षणे आहेत.
नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेज तथा शासकीय विद्यालयात आलेल्या संशयित रुग्णाचे हे नमुने एनायव्ही आणि दिल्लीच्या एनसिडीसीला पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आला असून, यामध्ये 74 पैकी 35 नमुन्यांमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असल्याचे समोर आले आहे. यातील 26 नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचे सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी म्हटले आहे.