नागपूर - लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीसाठी नागपुरात औषध दुकानाचा वापर केल्याची घटना ताजी आहे. अशातच पुन्हा औषधांच्या नावाखाली मद्य तस्करीचा प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातून नागपुरात आलेल्या एका कारमधून औषधांसह विदेशी मद्याच्या बॉटल जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यातील एकजण हा औषध दुकानाचा मालक आहे. चारही आरोपी नागपूरचे राहणारे आहेत.
औषधांच्या नावाखाली मद्य तस्करी.. कारमधून औषधांसह विदेशी मद्यसाठा जप्त, चौघांना अटक - चौघांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यातील एकजण हा औषध दुकानाचा मालक आहे. चारही आरोपी नागपूरचे राहणारे आहेत.
सोमवारी पहाटे नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर तपासणी करताना पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाची हुंदाई वेर्णा कार थांबवली. या कारच्या समोरच्या काचेवर 'अत्यावश्यक सेवा - औषधे' असे लिहिले होते. कारमध्ये त्यावेळी चौघेजण होते. कारची तपासणी केल्यावर औषधांच्या बॉक्सखाली मद्याचे बॉक्स आणि सुमारे पावणेदोन लाख रुपये पोलिसांना आढळले. पोलिसांनी कारसह सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.
या कारवाईत कारमध्ये पोलिसांना मद्याच्या लहान-मोठ्या २५९ बॉटल आढळल्या आहेत. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती कायदा, साथ रोग अधिनियम व महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले असून मद्य कोणाकडून आणले व कुठे विक्री करणार होते, याचा अधिक तपास करत आहेत.