मुंबई -येस बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी व मुलींना सीबीआय न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात कपूरची पत्नी बिंदू आणि मुली राधा खन्ना आणि रोशनी यांना आरोपी बनवण्यात आले आहे. कपूर यांची पत्नी व मुलींनी जामिनासाठी अर्ज केला होता. सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज नाकारला असून तिघांचीही भायखळा कारागृहात रवानगी केली आहे.
भायखळा कारागृहात रवानगी
येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याचे संक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीत समोर आले आहे. तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात कपूरची पत्नी बिंदू आणि दोन मुलींना आरोपी बनवण्यात आले आहे. या आरोपपत्राची दखल घेत सीबीआय न्यायालयाने या तिघांनाही समन्स बजावले होते. मात्र, या तिघींनीही आपली बाजू न्यायालयात मांडली. आणि वकील विजय अग्रवाल आणि राहुल अग्रवाल यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने राणा कपूर यांची पत्नी व मुलींना जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार देत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या तिघींचीही भायखळा कारागृहात रवानगी केली आहेत.