मुंबई - करी रोड येथील अविघ्न पार्क या गगनचुंबी इमारतीला शुक्रवारी सकाळच्या सुमारास आग लागली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीच्या विकासकावर पालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी उंच इमारती व अग्नी सुरक्षिततेबाबत एक ठोस धोरण निश्चित करावे, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या आहेत.
अग्निसुरक्षेबाबत धोरण बनवा -
करी रोड येथील अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या उपायुक्तांच्या बैठका घेतल्या. या बैठकीला, उपआयुक्त (परिमंडळ -१) विजय बालमवार, उप आयुक्त (परिमंडळ -२) हर्षद काळे, उप आयुक्त (परिमंडळ -३) पराग मसुरकर, उप आयुक्त (परिमंडळ -५) विश्वास शंकरवार उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन ) संजोग कबरे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्पिंकलर पद्धतीमुळे घरातील आगींवर आपण बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवित असलो तरी उंच इमारतीमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्पिंकलरसोबतच अन्य अग्निसुरक्षा साधनांचा समावेश करण्याबाबत अग्निशमन दलाने काटेकोर नियोजन व तयारी करावी. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी उंच इमारती व अग्नी सुरक्षिततेबाबत एक ठोस धोरण निश्चित करावे अशा सूचना महापौरांनी केल्या.