मुंबई -कार्डिला क्रूझ ड्रग प्रकरणी झालेल्या कारवाई दरम्यान पंच असलेल्या प्रभाकर साईल याने या प्रकरणातील जे काही सत्य आहे ते समोर आणणार असल्याचे सांगितले. माझ्यावर कोणतेही आरोप केले तरी या डीलशी माझा काही संबंध नाही, मी एक स्वच्छ नागरिक असून मला बदनाम केले जात आहे, असेही साईल याने सांगितले.
हेही वाचा -आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी; आर्यनच्या वकिलांकडून प्रतिज्ञापत्र दाखल
कार्डिला क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. या प्रकरणी सर्व आरोपी गेले महिनाभर न्यायालयीन कोठडीत आहेत. याच दरम्यान याप्रकरणातील मुख्य पंच असलेल्या प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्र सादर करत आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाली. त्यानंतर 18 कोटींवर डील फायनल झाल्याचा आरोप केला आहे. यावर प्रभाकर साईल याला पैसे मिळाले नाहीत म्हणून तो असे आरोप करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
प्रभाकर साईल याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोज संसारे यांच्या वडाळा येथील कार्यालयात एक पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या 40 वर्षात आपल्यावर एकही गुन्हा दाखल नाही. मी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही. एनसीबीच्या कारवाई दरम्यान झालेल्या डीलशी आपला संबंध नाही. मी पगारावर घर चालवणारा व्यक्ती आहे. मला कोणी आमिष दाखवले नाही, असे स्पष्टीकरण साईल याने दिले आहे.
माझ्या मुलीचा वाढदिवस होता. त्यासाठी मी किरण गोसावीकडे पैसे मागितले होते. त्याने मला दिले नाहीत. नंतर मला त्याच्या मित्राच्या अकाउंटवरून 5 हजार रुपये देण्यात आले. नंतर 10 हजार रुपये दिले. मला माझ्या पगाराशी देणेघेणे आहे, इतर कोण काय करतात त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मी आर्यन खान प्रकरणानंतर सोलापूरला मित्राकडे होतो. त्यावेळी माझ्या राहत्या घरी पोलीस येत होते असे पत्नीने सांगितले. त्यानंतर माझ्या मित्राने मला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर येथील नेत्यांशी भेट घालून दिली. त्यांनी मला मनोज संसारे यांना भेटवले. संसारे यांना यात तथ्य वाटल्याने त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणावे असे सांगितले. त्याप्रमाणे सत्य समोर आणत असल्याचे साईल याने सांगितले.
हेही वाचा -"मी गुपचुप तुझ्याकडून गांजा घेईल" अनन्या-आर्यनचे "ते" कथित व्हाटसअॅप चॅट आले समोर!