मुंबई -शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली आहे. गोरेगाव येथील पत्राचार भूखंड घोटाळ्या प्रकरणात त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई प्रामुख्याने स्वप्न पाटकर यांनी ईडीला दिलेल्या जवाबामुळे करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच स्वप्ना पाटकर यांनी पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून या प्रकरणात जबाब दिल्यामुळे जीवे मारण्याची धमकी येत असून यामागे मुख्य मास्टरमाईंड संजय राऊत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात संजय राऊत विरोधात रविवार रोजी वाकोला पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्यावर यापूर्वी देखील स्वप्न पाटकर यांनी 2015 मध्ये अनेक आरोप लावले होते. त्यानंतर या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिले होते. एकेकाळी राऊत कुटुंबीयांसोबत अतिशय जवळचे संबंध असणारे स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांचे काही कारणास्तव वाद निर्माण झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
डॉक्टर महिलेचे गंभीर आरोप - संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांकडून दाद मिळत नाही म्हटल्यावर आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर होते. त्यांनीच शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
न्यायासाठी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र -डॉ. स्वप्ना पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची विनवणी केली आहे. त्यांनी स्वत:ला सुशिक्षित महिला असल्याचे सांगत पत्रात लिहिले की, त्यांना सहानुभूती नको तर न्याय पाहिजे. स्वप्ना पाटकर यांनी आरोप केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे सह- संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून त्यांना शिवीगाळ करत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत.