मुंबई -कॉर्पोरेट जगातील सर्वात मोठे नाव असलेले इंद्राणी मुखर्जी ( Indrani Mukherjee ) हिला 2015 मध्ये स्वतःच्याच मुलगी शीना बोराची हत्या केलेल्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून अटक केली होती. तब्बल साडे सहा वर्षापेक्षा अधिक काळ इंद्राणी मुखर्जी भायखळातील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे साडे 6 वर्षानंतर कारागृहातून इंद्राणी मुखर्जीचा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया की नेमकी इंद्राणी मुखर्जी कोण आहेत. ज्यांच्यावर स्वतःचीच मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा आरोप आहे.
इंद्राणी मुखर्जी यांच्याबद्दल थोडक्यात - इंद्राणी मुखर्जी या ब्रिटिश माजी एचआर सल्लागार आणि मीडिया एक्झिकेटिव्ह होत्या. आयएनएक्स या मीडिया हाऊसेचे माजी संचालक पीटर मुखर्जी सोबत इंद्राणीने लग्न केले होते. हे तिचे तिसरे लग्न होते. आता त्यांच्या घटस्फोट झाला आहे. 2007 मध्ये तिने पती पीटर मुखर्जी सह INX मीडियाची स्थापना केली होती. या मीडिया हाऊसमध्ये इंद्राणी सीईओच्या भूमिकेत वावरत होती. 2009 मध्ये तिने कंपनीचा राजीनामा दिला आणि नंतर तिने आपला हिस्सा विकला होता. ऑगस्ट 2015 मध्ये, तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि तिची मुलगी शीना बोराच्या कथित हत्येची मुख्य आरोपी म्हणून इंद्राणीची नवी ओळख समोर आली.
इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांचा घटस्फोट -शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोघांत कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. ८ नोव्हेंबर २००२ ला स्पेशल मॅरेज कायद्यानुसार व हिंदू पद्धतीनुसार पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचा विवाह झाला होता. दरम्यान, याआगोदर इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून पीटर मुखर्जीला तुरुंगातच सोडचिठ्ठीची नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यात दोघांच्याही एकमतानुसार लंडन, स्पेनसारख्या शहरातील संपत्ती आणि बँक खात्यातील फिक्स डिपॉझिट आणि इतर मालमत्तेची दोघांमध्ये समान वाटणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्व मागण्यांना पीटर मुखर्जी तयार झाला होता. दोघेही विवाह बंधनातून वेगळे होण्यासाठी सहमतीने तयार झाले असल्याने दोघेही कायदेशीररीत्या आता विभक्त झाले.
शीना बोरा नेमकी कोण ?
शीनाची हत्या का झाली? हे प्रकरण नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी शीना बोरा कोण होती हे जाणून घेऊया. शीना बोरा ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी होती. इंद्राणी 'मीडिया टायकून' म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी. त्यामुळे शीना बोरा, पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली, असल्याचा आरोप आहे. शीनाची हत्या तिचीच आई इंद्राणीने केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण -इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. तिचा पहिला पती हा सिद्धार्थ दास. त्रिपुरा येथील टी स्टोअर ओनर असलेला सिद्धार्थ दास हा तिचा पहिला पती होता. सिद्धार्थपासून इंद्राणीला झालेली मुलगी म्हणजे शीना बोरा. नंतर इंद्राणीने कोलकतामधील व्यापारी संजीव खन्ना याच्यासोबत दुसरे लग्न केले. इंद्राणीचे तिसरे लग्न झाले ते मीडिया टायकून पीटर मुखर्जींसोबत. या दोघांमध्ये 16 वर्षांचे अंतर होते. इंद्राणीसोबत तिची मुलगी शीना राहातो होती. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचं सांगितले. अशातच पीटर मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.
शीना बोरा हिची हत्या झाल्याचा असा झाला खुलासा -21 ऑगस्ट 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीत श्यामने तो एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करण्यात सहभागी होता असा धक्कादायक खुलासा केला होता. श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही शामिल होता. अशी माहिती राकेश मारिया पुस्तकात देणात आलेली आहे.