हैदराबाद - राष्ट्रपती पदाची निवडणूक आली की शरद पवारांचे नाव गेल्या काही निवडणुकीत नेहमीच आघाडीवर असते. याहीवेळी शरद पवारांचे नाव राष्ट्रपती निवडणुकीत प्रकर्षाने येत आहे. मात्र नेहमीप्रमाणे आकड्यांचा हवाला देत शरद पवार यांनी आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहणार नाही हे स्पष्ट केले आहे. मात्र निवडणुकीच्या मतांचे गणित जुळले तर पवार यावेळी बाजी मारू शकतात. त्याचवेळी ते कोणताही धोका पत्करणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपनेच शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी द्यावी असे म्हटले आहे. आदित्य ठाकरे उद्या आयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यानिमित्ताने राऊत सध्या आयोध्येत आहेत. त्यांनी केलेले विधान सूचक आहे. पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे यासंदर्भात काही खलबते झाली तर राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत शरद पवार राहतील का याचा कानोसा घेता येईल. मात्र उद्या विरोधकांच्या बैठकीत नेमके कुणाचे नाव पुढे येते, तेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शरद पवारांच्या उमेदवारीची चर्चा - तरीही शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशीही चर्चा केली आहे. मात्र शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केले असल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी मात्र आग्रही आहेत. पवारांचे महाराष्ट्रातील मित्रपक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेला ते राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचे एकमताने उमेदवार म्हणून हवे आहेत.
ताकही फुंकून पिणार - नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत, विशेषत: महाराष्ट्रात, जिथे भाजपने शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत एक जागा मिळवली. त्यात विरोधकांनी मोठा फटका बसला. सेनेला पाठीशी घालण्याचे आश्वासन देणाऱ्या अनेक अपक्ष आमदारांनी आपला उमेदवार निवडून आणण्यात भाजपला यश आले. त्यामुळे राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेणार हे स्पष्ट आहे. तरीही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असे स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असे शरद पवारांनी बैठकीत उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितले.
काँग्रेसचा पवारांना पाठिंबा - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील असे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्राची व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. दुसरीकडे गुलाम नबी आझाद यांचे नाव काँग्रेस पुढे करणार असल्याचीही केंद्रिय वर्तुळात चर्चा आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनीही शरद पवारांना रविवारी फोन केला होता. त्यांनीही शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी आग्रह धरला आहे.
काँग्रेससह इतर विरोधकांची मोर्चेबांधणी - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्या दि १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.