मुंबई -गुजरातमध्ये पकडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. हे पैसे कुठून येतात, कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, याचा योग्यवेळी आम्ही खुलासा करु, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये आज (गुरुवार) पत्रकारांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात गुजरातमध्ये मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचा उल्लेख केला. '२१ हजारांचे ड्रग्ज कुठे पकडतात, 'ते पैसे कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, हे सर्व आम्हाला माहित आहे. त्याचा योग्यवेळी खुलासा करु,' असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा - राजकीय हेतूने मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश, आता राष्ट्रवादीशी संबंधित बँकांचे घोटाळे बाहेर काढणार - दरेकर
'विषय पैशांचा नाही, स्वाभीमानाचा आहे'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपये मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, संजय राऊत यांनी मानहानीची सव्वा रुपये असलेली रक्कम वाढवावी. कारण संजय राऊत यांची किंमत नक्कीच सव्वा रुपया एवढी नाही, असे म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आज (गुरुवार) संजय राऊत म्हणाले, 'मुद्दा हा पैशांचा नाही. प्रश्न हा स्वाभीमानाचा आहे. अब्रुची आणि स्वाभीमानाची किंमत होत नाही. ही स्वाभीमानाची लढाई आहे.'
चंद्रकांत पाटील हे खोटं बोलले. त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. ते माझीच नाही तर महाराष्ट्रात सगळ्यांचीच जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत. बदनामी करणे हाच त्यांचा राजकीय धंदा आहे. त्यामुळे तुम्हाला कोर्टात खेचून या खोटे बोलण्याचा, बदनामीचा जाब द्यावा लागेल, असेही राऊत म्हणाले.
'२१ हजार कोटींच्या ड्रग्जचे पैसे कुठे जातात आम्हाला माहित आहे'
भाजप हा पैसेवाल्यांचा पक्ष आहे, असे सांगत राऊत म्हणाले, रुपया, सव्वा रुपया, सव्वा कोटी, सव्वाशे कोटी हे आकडे फक्त दाखवायला असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यावर टीका करु शकत नाही. आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहेत. पैसे कुठून आले हे आम्हाला माहित आहे. २१ हजार कोटींच्या ड्रग्जचा उल्लेख केला. ते म्हणाले, २१ हजारांचे ड्रग्ज कुठे पकडतात, 'ते पैसे कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, हे सर्व आम्हाला माहित आहे. त्याचा योग्यवेळी खुलासा करु,' असेही संजय राऊत म्हणाले.
काय आहे गुजरात ड्रग्ज प्रकरण? -
गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले होते. ज्याची किंमत सुमारे 21 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.
हेही वाचा -सव्वा रुपये असो किंवा सव्वा कोटी रुपये, पैश्यांपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व असते - संजय राऊत