मुंबई -मुंबई सत्र न्यायालयातील विशेष 'एनआयए' कोर्टाकडून सचिन वाझेंची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सचिन वाझेला 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज सचिन वाझेंचा वैद्यकीय अहवाल देखील न्यायालयात सादर करण्यात आला. वाझेंची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना उपचारांची गरज नसल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले.
दरम्यान, वाझेंचं पत्रं मीडियात लीक झाल्याबद्दल एनआयएने जोरदार आक्षेप घेतला. वाझे कस्टडीत असताना त्यांचं पत्र लीक झालंच कसं? असा सवाल 'एनआयए'ने केला. दरम्यान याबाबत न्यायालयाने वाझेंच्या वकिलांना विचारणा केली असता, मला यातलं काहीच माहीत नसल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे. पत्र कसे बाहेर आले, याबाबत मला काहीच माहित नाही, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे यावेळी वाझेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी सक्त ताकीद न्यायालयाने वकिलाला दिली आहे.