मुंबई -कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशात मृतदेह थेट नदीत सोडले जात आहेत, हा प्रकार क्लेशदायक असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. तसेच महाराष्ट्र सोडला तर देशातील आरोग्य व्यवस्था कशा अपयशी ठरल्या आहेत, याचे विदारक चित्र आज समोर येत असल्याची चौफेर टीकाही पाटील यांनी भाजपवर केली.
'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन'
राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत आहेत. मुंबई आणि पुणे वगळता इतर भागांत रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावला आहे. १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रुग्णसंख्या यामुळे मर्यादित येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
लसींचा तुटवडा
महाराष्ट्रात लसअभावी केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. पुरवठादार कंपनीनेही लसींचा तुटवडा असल्याचे सांगितले. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यास सध्या स्थगिती दिली. मात्र, दुसरा डोस वेळेत मिळावा, हे यामागचे कारण आहे. तो न दिल्यास त्याचा प्रभाव कमी होईल, असेही पाटील म्हणाले.
उत्तर प्रदेशात कोरोना हाताबाहेर
उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर वाढला आहे. तो आटोक्यात आणणे, तेथील सरकारच्या हाताबाहेर गेला आहे. आरोग्य व्यवस्था उभारलेली नाही. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी अपुऱ्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत गंगा, यमुना नदीत मृतदेह सोडणे, हे क्लेशदायक आहे. या नदीतील पाणी अनेकजण पितात. महाराष्ट्र सोडला तर देशातील व्यवस्था कशा अपयशी ठरत आहेत, त्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे. असे प्रकार थांबवायचे असेल तर लसीकरणावर भर द्यावा लागेल, असे जयंत पाटील म्हणाले.
'पीआर एजन्सीबाबत माहिती नाही'
उपमुख्यमंत्री पवार यांच्या कामकाजाच्या प्रसिद्धिसाठी खासगी पीआर एजन्सीबाबत माहिती नाही. माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे स्पष्टीकरण देणार नाही, असे पाटील यांनी म्हटले. तसेच कॅबिनेटमध्ये झालेल्या चर्चा बाहेर बोलायची नसते. तसेच कामकाज करताना कोणावरही राजकीय नाराजी धरू नये, अधिकाऱ्यांकडून कोंडी होणार असल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे पाटील म्हणाले.
हेही वाचा -महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा
हेही वाचा -'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले