मुंबई -मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने निवडणुका ( BMC Election 2022 ) होणार आहेत. मागील महापालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग रचना केल्यावर भाजपाला फायदा झाल्याने प्रभाग रचना बदलण्यात आली आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार मुंबईत ९ प्रभाग ( New Ward Formation Draft ) वाढणार आहेत. त्यामधील ६ मतदार संघात शिवसेनेचे तर ३ मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत. यामुळे प्रभाग रचनेच्या माध्यमातून शिवसेनेचा फायदा होणार आहे.
१४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती-
मुंबई महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापालिकेतील प्रभागांची संख्या ९ने वाढवली आहे. यामुळे पालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. प्रभाग वाढल्याने प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. बहुतेक प्रभागांच्या सीमा बदललेल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेचा नकाशा पालिकेने आपल्या वेब पोर्टलवर टाकला असून त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागवल्या आहेत. १६ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे. प्रभाग रचनेचा अहवाल २ मार्चला पालिकेकडून निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.