मुंबई -कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत असताना रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याचसोबत रुग्णवाहिका देखील वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय वाढलीय.
रुग्णांना वेळेवर बेड मिळावा तसेच रुग्णवाहिकेची सोय व्हावी, यासाठी पालिकेमार्फत 24 विभाग कार्यालयांवर आणि त्यामधील साहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी सोपवण्यात आलीय. यासंबंधी परिपत्रक काढण्यात आले आहे. सध्या शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 45 हजारांवर गेला आहे. यातील 25 हजार सक्रिय रुग्ण आहेत. रोज नव्याने हजारांवर रुग्ण आढळत आहेत.
तसेच रुग्णवाहिका कमी असल्याने त्याही वेळेवर मिळत नाहीत अशी तक्रार रोजच समोर येत आहे. रुग्णांना बेड आणि एम्ब्युलन्स मिळत नसल्याच्या रोज तक्रारी येत असल्याने पालिका आयुक्तांनी रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार रुग्णांना बेड आणि रुग्णवाहिका मिळवून देण्याची जबाबदारी पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांवर सोपवली आहे.
मुंबई महापालिका आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार विभाग कार्यालयातील डिजास्टर कंट्रोल रूम आणि वार रूम म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विभाग कार्यालयात असलेल्या डिजास्टर कंट्रोल रूममधील फोनच्या 30 लाइन असाव्यात. या कंट्रोल रूमचे प्रमुख हे साहाय्यक आयुक्त असतील. तसेच कंट्रोल रूम वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कडून डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल, असे अंतर्भूत आहे.
दरदिवशी सकाळी 8 वाजता साथ नियंत्रण विभागाकडून या वॉर रूमला पॉझिटिव्ह रुग्णांची यादी ऑनलाइन दिली जाईल. ती मिळताच वॉर रूममधील डॉक्टरांकडून पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे आहेत की नाही हे तपासावे लागते. तसेच ते ज्या विभागात राहतात, त्याची माहिती घेऊन रुग्णालयात दाखल करावे लागते.
साहाय्यक आयुक्तांनी आठ जनरल आणि दोन 108 च्या रुग्णवाहिका तैनात करण्याचे सांगितले आहे. विभागातील रुग्णालयांत रिक्त असलेल्या खाटांची माहिती साहाय्यक आयुक्तांनी रोज वेब पोर्टलवर टाकावी. यात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.