महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वेच्या दोन फलाटाच्या मधोमध पोलीस ठाणे, कर्मचाऱ्यांना सहन होईना लोकलचे हादरे - फलाट

दोन रुळाच्या मधोमध असणाऱ्या या पोलीस ठाण्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जेव्हा ट्रेन बाजूने जाते तेव्हा ही चौकी हादरण्यास सुरुवात होते. यामुळे अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.

रेल्वेच्या दोन फलाटाच्या मधोमध पोलीस ठाणे

By

Published : Apr 20, 2019, 1:53 PM IST

Updated : Apr 20, 2019, 2:39 PM IST

मुंबई - वडाळा लोहमार्ग पोलीस कर्मचाऱयांना पोलीस ठाण्यात आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. रेल्वे स्थानकावरील फलाटाजवळ हे पोलीस ठाणे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लोकलचा आवाज येतो. याचा त्रास पोलिसांना होत आहे. यामुळे नवीन चौकी मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

रेल्वेच्या दोन फलाटाच्या मधोमध पोलीस ठाणे असल्याने कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय

हार्बर रेल्वेवरील गजबलेल्या वडाळा रेल्वे स्थानकाच्या दोन रुळाच्या अगदी मधोमध असणाऱ्या या पोलीस ठाण्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भितींनाही तडे ही गेले आहेत. जेव्हा ट्रेन बाजूने जाते तेव्हा ही चौकी हादरण्यास सुरुवात होते. यामुळे अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.

रेल्वेच्या हद्दीतील सुरक्षेकरिता रेल्वे प्रशासनाने वडाळा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि ३ च्या अगदी सीएसटीला जाणाऱ्या रुळांच्या मधोमध २००० साली नवीन पोलीस ठाणे बांधले. येथील चौकीत १८५ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या लोकलमुळे पोलीस ठाण्याला हादरे बसत आहेत. हे पोलीस ठाणे कमकुवत होऊन पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे पर्यायी जागेची मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने या पोलीस ठाण्याचे कार्यालय धोकादायक ठरवून नवीन पर्यायी जागा देण्याबाबत सूचना जारी केल्या. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत फलाट क्रमांक एक वरील मोकळ्या भूखंडावर २०१५ मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र त्यांनतर केवळ पायाभरणी करून हे काम थांबविण्यात आले. याबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही गेल्या चार वर्षांपासून रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

महिला आणि पुरुषांना एकच शौचालय
एकीकडे पंतप्रधान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, अरुंद अशा चौकीमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये केवळ एकाच शौचालयाची व्यवस्था आहे. नाईलाजाने महिला कर्मचाऱयांना याचा वापर करावा लागतो. महिला कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही. पावसाळ्यात पोलीस ठाण्यात पाणी भरते. येथील कागदपत्रेही भिजतात.

१३ रेल्वे स्थानकांचा भार
या पोलीस ठाण्यावर एकूण १३ रेल्वे स्थानकाचा भार आहे. हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड ते चेंबूर आणि किंग्जसर्कल आणि माहीम रेल्वे स्थानाकापर्यंत याची हद्द आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल या चौकीतूनच केली जाते. अरुंद असलेल्या या ठाण्यात पुष्कळ तक्रारदाराची गर्दी निर्माण होते.

कानाला त्रास होऊ नये यासाठी प्लगचा वापर
पोलीस ठाणे दोन फलाटाच्यामध्ये असल्यामुळे दिवसातून अनेक रेल्वे येथून ये-जा करतात. त्यांच्या आवाजामुळे कानाला इजा होऊ नये यासाठी काही पोलीस कर्मचारी एअर प्लगचा वापर करतात.

वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाल म्हणाले, मी स्वतः या अनेक बदल या चौकीसाठी केले आहेत. टाईल्स लावून घेतले. डागडुजी करून घेतली. पाण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे जावं लागतं होत आता टाकी आणि एक्वागार्ड लावून घेतले आहे. येथे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कानाचा त्रास ही सुरू झाला आहे. नव्या चौकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आता पहिल्यापेक्षा चौकी सुस्थितीत आहे. महिला कर्मचाऱ्यांना वेगळे शौचालय आणि कपडे बदलण्यासाठी एक रूम फक्त बाकी आहे. नवीन चौकी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

Last Updated : Apr 20, 2019, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details