मुंबई - दादर शिवाजी पार्क येथे समुद्राला लागून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. या चैत्यभूमीला लागूनच समुद्रात बांधकाम करून व्हिविंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या लाखो लोकांना समुद्र किनारा आणि सिलिंकसोबत सेल्फी काढता येणार असल्याची माहिती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
का उभारली जाणार व्हिविंग गॅलरी -
दादर चैत्यभूमी येथे मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची मल विसर्ग वाहिनी आहे. या वाहिनीची डागडुजी केली जात नसल्याने विसर्ग वाहिनीची अवस्था दयनीय झाली आहे. या वाहिनीतून मिलमधील पाणी समुद्रात सोडले जात होते. मिल बंद असल्याने या विसर्ग वाहिनीचा काहीही उपयोग होत नाही. शिवाजी पार्क येथील समुद्र किनारी भेट देणारे लोक या विसर्ग वाहिनीवर येऊन बसतात. याकारणाने विसर्ग वाहिनीचे नुकसान होत आहे. पर्यटक या विसर्ग वाहिनीवरून चालत जाऊन फोटो काढतात त्याठिकाणी बसतात. यामुळे पर्यटक समुद्रात पडून पर्यटकांच्या तसेच विसर्ग वहिनीची सुरक्षा धोक्यात आली आहे. या ठिकाणी विसर्ग वाहिनीतील घाण समुद्र किनारी साचत असल्याने समुद्र किनारी अस्वच्छता दिसून येत आहे. समुद्र किनारा स्वच्छ दिसावा आणि व्हिविंग गॅलरी बांधल्याने विसर्ग वाहिनीची सुरक्षा व्हावी, म्हणून व्हिविंग गॅलरी बनवली जाणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.