मुंबई- देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था पाहता सरकारविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. सरकारने 15 दिवसात निर्णय न घेतल्यास 'सेव्ह नेशन' या नावाने मोहीम छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर - प्रमुख, वंचित बहुजन आघाडी हेही वाचा -रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - राखी जाधव
आम्ही अराजकीय चळवळ करायची ठरवले आहे. सेव्ह नेशन या नावाने ही चळवळ असेल. मागच्या सरकारप्रमाणे हे सरकारसुद्धा खासगीकरणाकडे वळत आहे. जी काही परिस्थतीत उद्भवतेय ते पाहता आर्थिक सार्वभौमत्व टिकले पाहिजे. सर्वत्र 'पब्लिक सेक्टर' न राहता 'प्रायव्हेट सेक्टर' होत आहे. यामुळे आम्ही ही चळवळ राबवण्याचे ठरवले आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारने भारत पेट्रोलियम किंवा एअर इंडिया विकायला काढली आहे. अर्थव्यवस्था ढासळल्याचे हे लक्षण आहे. आम्ही शासनाला असं सांगू इच्छितो की, शासनाने लोकांकडून ऑफर मागवून शेअर विकत घ्यायला सांगावे. यासाठी समिती स्थापन करावी. सर्व शेअर एकत्र विकण्यापेक्षा ते लोकांना विकावे व पैसे जमा करावेत. कुठल्याही व्यक्तीला एक लाखांपेक्षा जास्त देऊ नये. राजकारणाच्या बाहेर राहून हे सर्व आम्ही करणार आहोत. यासाठी सुरुवात मुंबईतून करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच सरकार जर स्वत:कडील नवरत्न विकत असेल, तर दारुडा जसे घरातले साहित्य विकतोय तसे हे सरकार नऊ दागिने विकत आहेत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.