महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण - महापौर किशोरी पेडणेकर - Vaccination of citizens in the age group of 18 to 44 in Mumbai from 21st June

मुंबईत सोमवार २१ जून पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वात मोठे लसीकरण सुरू होत आहे. काही खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण सुरू आहे. खाजगी सेंटरवर हजारो रुपये मोजून श्रीमंतांनाच या वयोगटासाठी लस मिळाली. आता सर्वसामान्यांसाठी लसीकरण होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर

By

Published : Jun 20, 2021, 3:15 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २१ तारखेपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू होणार आहे. त्यानुसार यात टप्पे पाडून लसीकरण केले जाईल. विशेषतः सुपरस्प्रेडरना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. तसेच गुरुवार ते शनिवार या दिवशी नोंदणीकृत लोकांचे लसीकरण केले जाते. त्या दिवशी काही प्रमाणात वॉक इन लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

खासगी सेंटरवर हजारो रुपये मोजून श्रीमंतांनाच लस मिळाली

मुंबईत सोमवार २१ जून पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वात मोठे लसीकरण सुरू होत आहे. काही खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण सुरू आहे. खाजगी सेंटरवर हजारो रुपये मोजून श्रीमंतांनाच या वयोगटासाठी लस मिळाली. आता सर्वात मोठ्या लोकसंख्येसाठी सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण पार पाडण्याचा टप्पा आलाय. देशभरात बहुप्रतिक्षीत असलेले तरुणांचे मोफत लसीकरण सुरू होत आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. व्यवसायानुसार सुपर स्प्रेडर गट जसे- फेरीवाले, रिक्षाचालक यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार असल्यी शक्यता महापौर पेडणेकर यांनी वर्तवली आहे.

..असे केले जाणार लसीकरण -

आजपर्यंत तरुणांच्या लसीकरणाला वारंवार ब्रेक लागले आहे. आता केंद्राकडून ८ लाख ७० हजारपेक्षा जास्त लसीचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आरोग्य शिबीरासारखे लसीकरण सुरू करता येणार आहे. राहत्या घरापासून जवळ नागरिकांना लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. मुंबईत २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. मुंबईत सध्या सोमवार, मंगळवार, बुधवार हे तीन दिवस वॉक इन लसीकरण सुरू आहे. तर, गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने लसीकरण सुरू आहे. गुरुवार ते शनिवार काही प्रमाणात नोंदणी तसेच काही प्रमाणात वॉक इन अशा दोन्ही पद्धतीने लसीकरण करता येईल, याचे प्रयत्न सुरू आसल्याचे महापौरांनी सांगितले. तिसरी लाट धोक्याची असेल, असे सांगितले जात आहे. लस घेतली तरी काळजी घेतली पाहिजे असे महापौर म्हणाल्या.

सिरमला पत्र -

कांदिवली हिरानंदिनी येथे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये दोन भरारी पथके नियुक्त केले आहेत. ही पथके लसीकरण केंद्रवर लक्ष ठेवणार आहेत. पालिका आणि पोलीस या प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहेत. कांदिवली बनावट लसीकरण प्रकरणी पालिकेने सिरमला पत्र लिहिले आहे. कांदिवली मधील सोसायटीमध्ये झालेल्या लसीकरणात वापरण्यात आलेल्या लसीच्या कुपीचा उल्लेख करून, हे पत्र देण्यात आले आहे. कांदिवलीमधील सोसायटीत ही वापरण्यात आलेली लस ही सिरमची आहे का, याचे स्पष्टीकरण मागवले आहे.

लोकलसाठी अजून वाट बघावी लागेल -

मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रोज आढळून येणारी रुग्ण संख्याही कमी होत असली, तरी कोरोनाचा धोका कायम आहे. अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात केंद्राकडून लस मिळेल. दुसरी लाट थांबवली आहे पण येणाऱ्या लाटेचा धोका आहे. आपला फोकस लोकांना वाचवण्यावर आहे. लोकांना वाचवणे महत्वाचे आहे. यामुळे मुंबई लोकलबाबत थोडे दिवस वाट बघावी लागेल, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलन होऊ द्यात -

नालेसफाई झाली नसल्याचा आरोप करत आज भाजपाने आंदोलन केले आहे. याबाबत बोलताना आंदोलन होत आहेत होऊ द्या. आम्ही कोरोना परिस्थिती हाताळत आहोत. मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.

३० ते ४४ वयोगटातील लसीकरण -

केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. लसीचा हवा तितक्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने, राज्य सरकारने २१ जूनपासून ३० ते ४४ वयोगटातील लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details