मुंबई -रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते दादरपर्यंत उपनगरीय ट्रेनच्या द्वितीय श्रेणीच्या डब्ब्यातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सहप्रवासी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी आणि प्रकल्पाचा आढावा सुद्धा घेतला.
रावसाहेब दानवे यांनी महिला राज असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. रेल्वे प्रकल्पाची केली पाहणी -
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपनगरीय रेल्वेने माटुंगा येथे प्रवास केला. महिला राज असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला कर्मचाऱ्यांनी आव्हानांवर धैर्याने आणि दृढनिश्चयाने कशी मात केली, याची माहिती घेतली. तसेच रेल्वे प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 18 येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन पुनर्विकास साईटलाही भेट दिली. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी आणि रेल्वे अधिकारी उपस्थितीत होते.
देशातील 68 रेल्वे स्थानकांचा होणार विकास -
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रेल्वेमध्ये सुधारणा सुरु आहेत. मुंबई सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याणसह देशातील 68 रेल्वे स्थानकांचा पीपीपी मॉडेलवर विकास करण्याचे केंद्राचे नियोजन आहे. मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकलवर केंद्राने विशेष लक्ष दिले आहे. वाहनतळाच्या धर्तीवर मुंबईतील रेल्वे स्थानके उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच लोकलमधील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याचे मंत्री दानवे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त सुविधा मुंबईकरांना कशा उपलब्ध होतील, याचा प्राधान्याने विचार करणार येईल. रेल्वे मार्फत सुमारे 50 हजार कोंटीचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. मुंबई लोकलने प्रवास करुन प्रवाशांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.
माटुंगा रेल्वे स्थानक -
संपूर्ण महिला कर्मचारी संचलित असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकाचा 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण महिला कर्मचारी संचालित असलेले माटुंगा रेल्वे स्थानक हे देशातील एकमेव रेल्वे स्थानक आहे. जुलै २००७ मध्ये या रेल्वे स्थानकावर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हे स्थानक 'महिला राज' स्थानक म्हणून ओळखले गेले.
हेही वाचा -महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांविरुद्ध ED चा ससेमिरा.. आतापर्यंत 'या' नेत्यांना समन्स अन् कारवाईचा घटनाक्रम