नवी दिल्ली - अडीच वर्षात काय दिवे लावले? असा सवाल करत नारायण राणे म्हणाले की, अडीच वर्षात जनतेसाठी काहीच केलं नाही. अडीच वर्षात मराठी माणसासाठी काहीच केले नाही. मातोश्रीबाहेरील कुणालाच प्रेम आणि विश्वास दिलं नाही. यांनी जे दिलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी दिलं...प्रेम, विश्वास, दु:खात समरस शिंदे झाले. उद्धव ठाकरे ( Shiv sena Chief Uddhav Thackeray ) खोटारडे आणि कपटी आहेत. अशी जहरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी केला. नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत घ्यायला सांगितली, संजय राऊत जोकर आहे, पत्रकार नाही. संजय राऊत यांची राज्यभर चेष्टा होतेय. अशी टीकाही त्यांनी केली आहे.
नारायण राणे यांचे प्रत्युत्तर -उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो व नाव न घेता लढा, असे आव्हान बंडखोरांना केले होते. त्यावर वारसा हा रक्ताने नव्हे विचाराने मिळत असतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचे ऐकले नाही. पण बाळासाहेबांचे ऐकले, असे उत्तर नारायण राणे यांनी दिले आहे. शिवाय, अडीच वर्षात काय केलं? तेव्हा मराठी माणूस, हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल केला.
हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे
'जळफळाट आणि केविलवाणी व्यथा' - सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट आणि केविलवाणी व्यथा आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानं उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. या व्यक्तीला मी 40 वर्ष ओळखतो, अंगात खोटेपणा, कपटीपणा, द्वेष आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.