मुंबई - कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांनाही मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सोमवारी ईडीच्या कार्यालयात उन्मेष जोशी यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. आज देखील उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी
सोमवारी ईडीच्या कार्यालयात उन्मेष जोशी यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
आज चौकशीचा दुसरा दिवस असून मुंबईतील बलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात ही चौकशी केली जात आहे. सोमवारी झालेल्या चौकशीमध्ये उन्मेष जोशी यांना कोहिनूरच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यामध्ये कंपनी कशाप्रकारे स्थापन करण्यात आलेली होती, या कंपनीचे क्लायंट कोण होते, कंपनीमध्ये पार्टनर कोण कोण होते, 2008 मध्ये या कंपनीवर कशा प्रकारे कर्ज झाले होते आणि आतापर्यंत किती बँकांचे व संस्थांचे कर्ज यांनी फेडले आहेत? याबाबतचा तपशील विचारण्यात आला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील 22 ऑगस्ट पर्यंत ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ठाकरे यांना समन्सद्वारे तसे कळविण्यात आलेले आहे. राज यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टला मनसेचे कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.