मुंबई - निवडणूका येत राहतील आणि जात राहतील मात्र शेतकरी सध्या त्याच्या आयुष्याच्या एका विचित्र उंबरठ्यावर उभा आहे. आज त्याला दिलासा देण्याची गरज आहे. त्याचे आयुष्य बदलणार नसेल तर या निवडणुका व युतीला काही अर्थ नाही. त्यामुळे पीक विम्याचा प्रश्न न सुटल्यास चर्चेचे रूपांतर आंदोलनात केल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शिवाय अन्नदाता त्याच्या हक्कापासून वंचित राहत असेल तर हे सर्वांसाठी लाजिरवाणे असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
चर्चेने प्रश्न सुटल नसेल तर आंदोलन करु; पीक विम्याप्रश्नी उद्धव ठाकरे आक्रमक
पीक विम्याचा प्रश्न न सुटल्यास चर्चेचे रूपांतर आंदोलनात केल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इशारा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना शिवसेना नुकसान भरपाई मिळून देणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
शिवसेनेने प्रत्येक तालुक्यात पीक विमा मदत केंद्र उभारली होती. शिवसेनेकडे या योजनेबद्दल तक्रारीदेखील आल्या. सध्या महाराष्ट्रात पूर संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनाली राठोड या महिला शेतकऱ्याने दोन एकरसाठी 1800 रुपयाचा विमा काढला होता. मात्र त्यांना केवळ 102 रुपयाचीच भरपाई मिळाली. अशाप्रकारे हा घोटाळा सुरू आहे. म्हणून शेतकऱ्यांना शिवसेना नुकसान भरपाई मिळून देणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
पीक विम्यातून 90 लाख शेतकऱ्यांना कोणी अपात्र ठरवले. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे. जर कंपनी विमा देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या योजनेअंतर्गत ज्या सुधारणा गरजेच्या आहेत. त्याबद्दल माननीय पंतप्रधानांशी बोलू. जर कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर या विरोधात शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.