मुंबई- शिवसेना भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पंढरपूरला जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 'शेतकरी कर्जमाफी' आणि 'दुसरा प्रधान मंत्री फसल विमा' यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मी पंढरपूरला जाणार नाही, उद्धव ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत सुतोवाच
मी पंढरपूरला जाणार नाही. हे कोणी पसरवले आहे हे मला माहीत नाही, मी माझा कार्यक्रम स्वतः जाहीर करेन, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पंढरपूरला जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करणार हे ठरले असताना, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील विठ्ठल-रुक्मिणी यांच्या महापूजेसाठी जाणार असल्याचे' संजय राऊत म्हणाले होते. दिल्लीत संजय राऊत यांनी या बातमीचे सूतोवाच केले होते.
राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्यभरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. अशोक चव्हाण यांनी यावर टीका करताना, "मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी ही शासकीय पूजा करणार असून, हा नवा पायंडा पाडला जात आहे. तो अयोग्य आहे" अशी टीका केली होती. परंतु, आता उद्धव ठाकरे यांनीच आपण जाणार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेने संजय राऊत हे मात्र चांगलेच तोंडघशी पडले आहेत.