मुंबई- लवकरच महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष पूर्ण होणार आहे. यानिमित्त खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अभिनंदन मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर करत उद्या धमाका असे लिहिले आहे.
अनेक प्रश्नांची मिळणार उत्तरे
४५ सेकंदाच्या या प्रोमोत संजय राऊत मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. राज्य आत्मनिर्भर कधी होणार? तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कसं वाटतंय..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेला हात धुवा हे सांगण्या पलिकडे काय करतात? मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरात तुमच्या जीवनात काय बदल झाले? असे प्रश्न राऊतांनी विचारले असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली आहेत.
तर हात धुवून मागे लागेन
एकूण मुलाखतीचा अवघा काही भाग या प्रोमोत दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मुलाखतीतील प्रश्न आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची काय उत्तरे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातील एक उत्तर राज्याच्या राजकारणात नक्कीच धमाका करेल. तुम्ही फक्त हात धुण्या शिवाय काही सांगत नाही असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला आहे. त्याला उत्तर देताना ते म्हणतात होया हात धुवायला सांगत आहे. पण अंगावर आला तर हात धुवून मागे लागेल असा इशाराच ते विरोधकांना देत आहेत.